सांगोला: (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागांसाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये खवासपूर, चिकमहुद आणि चिनके या तीन ग्रामपंचायतींमधील निवडणूक बिनविरोध झाली असून, अनकढाळ सरपंच पदासाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे.

३० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत तहसील कार्यालय, सांगोला येथे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले होते. बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये प्राप्त झालेले सर्व अर्ज वैध ठरले आहेत.

तालुक्यातील राजकीय घडामोडींनुसार तीन ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे.खवासपूर येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला होता, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.चिकमहुद व चिनके या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी २ अर्ज आले होते. मात्र, त्यापैकी प्रत्येकी एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने या दोन्ही ठिकाणी आता प्रत्येकी एकच उमेदवार शिल्लक राहिला आहे. परिणामी, या जागाही बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

थेट जनतेतून सरपंच निवडल्या जाणाऱ्या अनकढाळ ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे सरपंच पदासाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने आता सात उमेदवारांमध्ये ही निवडणूक लढवली जाणार आहे.
या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता अनकढाळच्या सरपंच पदाच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



