गणरायाच्या उत्सवातून दिव्यांगांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार!
सांगोला (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता समाजातील गरजू घटकांच्या भविष्यासाठी काहीतरी भरीव करण्याचा प्रयत्न नृसिंह गणेश तरुण मंडळाने केला आहे. उत्सवातील खर्चाला वेगळी दिशा देत दिव्यांग बांधवांच्या नावावर मुदतठेव ठेवण्याचा उपक्रम निश्चितच विचार करण्यास भाग पाडणारा आहे, असे प्रतिपादन मेट्रिक्स ग्लोबल अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, सांगोलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भारत गरांडे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या आनंदासोबत दिव्यांग बांधवांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार उभा करण्याचा आगळावेगळा उपक्रम सांगोल्यातील नृसिंह गणेश तरुण मंडळाने राबविला आहे. नृसिंह गणेश तरुण मंडळ, लोहार गल्ली, सांगोला यांच्या वर्ष २९ व्या गणेशोत्सवानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा उपक्रम संपन्न झाला. सांगोला नगरपरिषदेचे नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, युवा नेते विजय भाऊ पैलवान, अँड.शिवनाथ भस्मे यांच्या शुभहस्ते सांगोला शहरातील बनकरवाडी येथील तेजस संजय चौधरी व सतीश बनसोडे या दोन दिव्यांग बांधवांच्या नावावर मुदतठेव ठेवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

मंडळाचे मार्गदर्शक श्री. रामचंद्र अण्णा बनकर व श्री. भारत भाऊसाहेब गरंडे सर यांच्या विशेष सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला. क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था, बनकरवाडी, मर्या. सांगोला तसेच मेट्रिक्स ग्लोबल अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, सांगोला या दोन्ही पतसंस्थांमध्ये दिव्यांग बांधवांच्या नावावर प्रत्येकी ५ हजार रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक सोमेश यावलकर म्हणाले की, गणेशोत्सवात होणारा खर्च केवळ सजावट आणि देखाव्यापुरता मर्यादित न राहता तो एखाद्याच्या आयुष्यात उपयोगी पडला, तर त्या उत्सवाचे समाधान अधिक मोठे असते. आज ठेवलेली रक्कम भविष्यात दिव्यांग बांधवांच्या एखाद्या गरजेच्या वेळी उपयोगी पडू शकते. त्यामुळे हा उपक्रम केवळ आर्थिक मदत नसून भविष्यासाठी निर्माण केलेला एक छोटासा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवातील सजावट, रोषणाई आणि इतर खर्चाला फाटा देत त्याच उत्सवाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचा विचार मंडळाने यंदा पुढे आणला आहे. एक दिवसाचा उत्सव संपतो; मात्र एखाद्याच्या नावावर केलेली आर्थिक ठेव त्याला भविष्यातही आधार देऊ शकते, या सामाजिक विचारातून हा उपक्रम साकारण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील मस्के, उपाध्यक्ष प्रथमेश भुजबळ, खजिनदार संतोष लिगाडे, सचिव सौरभ शिर्के, सहखजिनदार युवराज पैलवान,गोविंद पाटकुलकर, प्रवीण सादिगले, अभिजीत राऊत, तुकाराम लिगाडे, मेजर मच्छिंद्र रसाळे, सचिन शिर्के रुद्र लोले, अभी राऊत, संग्राम वाघमोडे, अण्णा शिर्के, प्रशांत शिर्के, गणेश खुळपे,उपस्थित होते.

“ही केवळ पाच हजारांची ठेव नाही; आमच्या भविष्याची चिंता करणारा आधार आहे!”
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमच्या नावावर मुदतठेव ठेवण्याचा नृसिंह गणेश तरुण मंडळाचा उपक्रम आमच्यासाठी खरोखरच वेगळा आणि प्रेरणादायी आहे. अनेकदा दिव्यांग व्यक्तींना भविष्यातील आर्थिक गरजांची चिंता असते. अशा वेळी आमच्या नावावर केलेली ही ₹५ हजारांची मुदतठेव म्हणजे आमच्या भविष्याला मिळालेला मोठा आधार आहे. उत्सवाच्या माध्यमातून आमच्यासारख्या दिव्यांग बांधवांचा विचार करून मदतीचा हात पुढे केल्याबद्दल मंडळाचे मनापासून आभार.
— दिव्यांग लाभार्थी सतीश बनसोडे

उत्सवातून सामाजिक सुरक्षिततेचा संदेश
“गणरायाच्या उत्सवाला सामाजिक जाणीवेची जोड देत दिव्यांग बांधवांच्या नावावर आर्थिक ठेव निर्माण करण्याचा विचार अत्यंत सकारात्मक आहे. आज केलेली ही छोटीशी आर्थिक तरतूद भविष्यात संबंधित कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते. उत्सवाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करण्याची नृसिंह गणेश तरुण मंडळाची ही भावना निश्चितच अनुकरणीय आहे.”
नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



