नृसिंह गणेश मंडळाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे सभापती सौ.पूनमताई इंगवले आणि मा.नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांच्याकडून कौतुक
सांगोला (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या माध्यमातून नृसिंह गणेश तरुण मंडळाने केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांच्या हाताला रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार आहे. उत्सवातून समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण करणार्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करते. भविष्यातही मंडळाने अशाच प्रकारे सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती पूनमताई इंगवले यांनी केले.

गणेशोत्सव या पारंपरिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत नृसिंह गणेश तरुण मंडळ, लोहार गल्ली, सांगोला यांनी यंदा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवानिमित्त गरजू महिला लाभार्थींना 2 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मंडळाच्या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारचा समाजोपयोगी उपक्रम घेण्याची संकल्पना विशेष लक्षवेधी ठरली. नृसिंह गणेश तरुण मंडळाच्या सामाजिक उपक्रमातून गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा देशपांडे व सौ.सुचिताकाकू दिलीप मस्के यांच्या सहकार्याने ही शिलाई मशीन देण्यात आली

या कार्यक्रमास सभापती पूनमताई इंगवले, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, पत्रकार मनोज उकळे सर, सुदर्शन इंगवले, युवा नेते विशाल घुटुकडे, मंडळाचे मार्गदर्शक विजय पैलवान, निहाल तांबोळी, उद्योगपती प्रफुल्ल सादिगले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते चिंचोली येथील गिरिजा चव्हाण तसेच सांगोला शहरातील अर्चना काशिलिंग बंडगर या गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
माजी नगराध्यक्षा सौ.राणी ताई माने म्हणाल्या ,गणरायाच्या आगमनाचा उत्सव साजरा करताना समाजातील गरजू घटकांचाही विचार व्हावा, या भावनेतून मंडळाने हा उपक्रम राबविला. शिलाई मशीन ही केवळ एक वस्तू नसून संबंधित महिलांच्या हाताला काम आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणारे साधन ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘उत्सव साजरा करा, पण त्यातून एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवा’, असा संदेश मंडळाने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवातील उत्सवाचा आनंद केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता, गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न मंडळाने या उपक्रमातून केला आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी मिळून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लागणार असल्याचे पत्रकार मनोज उकळे सर यांनी सांगत मंडळाचे उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील मस्के, उपाध्यक्ष प्रथमेश भुजबळ, खजिनदार संतोष लिगाडे, सचिव सौरभ शिर्के, विजयकुमार मस्के, अक्षय सपाटे, युवराज पैलवान, गोविंद पाटकुलकर, प्रवीण सादिगले, विनायक मस्के, अभिजीत राऊत, तुकाराम लिगाडे, रविकांत मस्के, मेजर मच्छिंद्र रसाळे, रुद्र लोले, अभी राऊत, संग्राम वाघमोडे, अण्णा शिर्के, प्रशांत घाडगे, प्रशांत शिर्के, रोहित शिर्के, सोहेल आतार,यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार सुनील पैलवान यांनी मानले.

नृसिंह मंडळाच्या उपक्रमांनी प्रभावित; सभापती यांच्याकडून मदत जाहीर.
नृसिंह गणेश तरुण मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेले विविध समाजोपयोगी उपक्रम पाहून पंचायत समितीच्या सभापती पूनमताई इंगवले यांनी कौतुकाची थाप देत गरजू लाभार्थी महिलांसाठी संसारोपयोगी साहित्याचा सेट देण्याचे जाहीर केले. उत्सवाच्या माध्यमातून गरजू महिलांना स्वावलंबनाचा आधार देण्याच्या मंडळाच्या कार्याची दखल घेत त्यांनी स्वतःहून ही मदत जाहीर केली. मंडळाच्या सामाजिक उपक्रमांना मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद उपस्थितांसाठीही कौतुकाचा विषय ठरला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



