सांगोला (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज इटकी येथील शेतकरी पोपट गोविंद सावंत व त्यांच्या पत्नी अक्काताई सावंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

यावेळी सावंत कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ करण्यात आला. तसेच कुटुंबीयांना नवीन कपड्यांची भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सावंत कुटुंबीयांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताने उपस्थित भारावून गेले.

या भेटीदरम्यान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सावंत यांच्या शेतीची, पिकांच्या परिस्थितीची तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींची आस्थेने विचारपूस केली. त्याचबरोबर कुटुंबाला रेशनचे धान्य वेळेवर मिळते की नाही, याचीही माहिती घेतली. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आणि समाजाचा अन्नदाता आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांना आधार व विश्वास देणे ही शासनाची जबाबदारी आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी आमदार बाबासाहेब देशमुख, सांगोला तहसीलदार श्रीमती भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. म्हेत्रे, तलाठी सोफिया पठाण, कृषी सहाय्यक हिप्परकर, कोतवाल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या घरातील आनंद हीच आमच्यासाठी खरी दिवाळी! या भावनेतून पार पडलेल्या या भेटीमुळे दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



