सायकलिंग चळवळ व्यापक करण्यासाठी रायडर्सना एकत्र येण्याचे आवाहन
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यात सायकलिंगची चळवळ अधिक व्यापक करण्यासह आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने सायकल रायडर्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता तोरणा, विटा बँकेजवळ, स्टेशन रोड, सांगोला येथे ही बैठक होणार असून, यावेळी सांगोला तालुका अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

सायकल रायडर्स असोसिएशन (रजि.) ही संघटना देशभरात शांती, समता आणि बंधुता या संतविचारांचा प्रसार करण्यासोबतच आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहे. संघटनेच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,५०० किलोमीटरची भव्य सायकलवारी आयोजित केली जाते.

संघटनेचे कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचविणे, अधिकाधिक तरुणांना सायकलिंगसाठी प्रोत्साहित करणे आणि सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्यसंपन्न भारत निर्माण करण्याचा संघटनेचा संकल्प आहे. याच अनुषंगाने सांगोला तालुक्यातील सायकलिंगची आवड असणाऱ्या सर्व रायडर्सना एका व्यासपीठावर आणून संघटनेचे कार्य विस्तारण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातील सर्व सायकलप्रेमी आणि सायकल रायडर्सनी या महत्त्वपूर्ण बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत भिसे व सचिव श्री. सुरेंद्र पिसे यांनी केले आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



