सांगोला( प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत भारतीय जनता पार्टी सांगोला यांच्यावतीने तहसीलदार सांगोला व पोलीस निरीक्षक सांगोला यांना निवेदन देण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्यावर खोटा आरोप करणे, बदनामी करणे, महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करणे व अराजकता माजवणे आणि तरुणांची माथी भडकवणे अशा स्वरूपाची तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या अपघात प्रकरणामध्ये व्ही एस आर कंपनीचे मालक रोहित सिंग असून त्यांना वाचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करीत आहेत, अशा पद्धतीचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हा आरोप चुकीचा व बिनबुडाचा असून त्याला कोणताही पुरावा नाही. पुरावा नसताना मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणे हे बदनामीचे षडयंत्र आहे. त्यामुळे अशा प्रकारे खोटे आरोप करून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने या निवेदनात मांडली आहे.

यावेळी बोलताना डॉक्टर मानस कमलापुरकर यांनी आमदार रोहित पवार यांना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही महाराष्ट्राच्या तरुण पिढीसाठी काय केले, तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय केले, तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आला तेथील किती प्रश्न सोडवले, हे सर्व करायचे सोडून फक्त राजकीय आरोप करणे व महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवणे एवढेच काम तुम्ही करत आहात, असा सवाल त्यांनी केला. तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा तुम्ही आमदार आहात, चांगले काम करा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अनेक अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे न करता फक्त राजकीय आरोप करणे आणि मी कसा महाराष्ट्राचा युवा नेता आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करणे, पोपटपंची करून स्टंट करणे एवढेच काम रोहित पवार करत आहेत, असा आरोप डॉक्टर मानस कमलापुरकर यांनी केला. त्यांनी रोहित पवार यांना महाराष्ट्रासाठी व आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी ठोस कार्य करावे, असेही आवाहन केले.

हे निवेदन भाजपाचे सोलापूर पश्चिम ग्रामीणचे जिल्हाअध्यक्ष गणेशजी चिवटे यांच्या सूचनेनुसार देण्यात आले. यावेळी भाजपाचे चिटणीस डॉक्टर मानस कमलापुरकर, भाजपा जिल्हा चिटणीस सोलापूर ग्रामीण पश्चिम विजयकुमार इंगोले, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अशोक इंगोले, श्रीकांत बाबर, दीपक भोसले, खंडू काका कुलकर्णी, अभय काटकर, ए एम बिले, शंकर खरात, ओंकार कुलकर्णी, श्रीनिवास देशपांडे, सत्यवान निंबाळकर, दारासिंग निंबाळकर, संजय बाबर, सुनील शिंदे, तेजस कुलकर्णी, सचिन सावंत, बाबासो बंडगर तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनानंतर प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या पदावरील व्यक्तीवर पुराव्याशिवाय आरोप करणे हे लोकशाहीला घातक आहे, त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



