सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी सांगोला नगरपरिषदेने अभय योजना लागू केली असून, थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये (दंडामध्ये) ५० टक्क्यांपर्यंत माफी मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सांगोला नगरपरिषदेच्या हद्दीतील थकीत मालमत्ता कराची वसुली व्हावी आणि नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ठराव क्रमांक २८४ अन्वये थकीत मालमत्ता करावरील एकूण शास्तीच्या ५० टक्क्यांपर्यंत माफी देण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर या अभय योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या योजनेचा लाभ घेताना नागरिकांना मूळ मालमत्ता करामध्ये कोणतीही सवलत मिळणार नसून, केवळ थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ५० टक्के माफी मिळणार आहे. १९ मे २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावरील शास्तीसाठी ही सवलत लागू राहणार आहे. मात्र, शास्ती माफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांना मूळ मालमत्ता करासह संपूर्ण थकबाकीची रक्कम भरणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी नगरपरिषदेकडे रीतसर अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत ५० टक्के शास्तीव्यतिरिक्त इतर सर्व रक्कम भरल्याची पावती जोडावी लागणार आहे. ही योजना २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे.

सांगोला शहरातील सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी भरावी आणि शास्तीवरील ५० टक्के माफी मिळवावी, असे आवाहन मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी मालमत्ता कराचा वेळेवर भरणा केल्यास नगरपरिषदेच्या विकासकामांना गती मिळेल. तसेच शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असे आवाहन नगराध्यक्ष आनंदा माने यांनी केले आहे.
‘आपला कर, आपल्या शहराच्या विकासासाठी!’या भूमिकेतून नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



