कमलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: ऋशांत ढोले याची सैनिकी शाळेत राज्यातून प्रथम क्रमांकाने निवड

0

कमलापूर (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, कमलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम राखत सैनिकी शाळा प्रवेशात दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कुमार ऋशांत सचिन ढोले याने आपली गुणवत्ता सिद्ध करत एक नवा इतिहास रचला आहे.

तुळजाभवानी देवस्थान संचलित सैनिकी निवासी शाळा (CBSE पॅटर्न), तुळजापूर या अत्यंत प्रतिष्ठित शाळेसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत ऋशांतने ओबीसी (OBC) प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या निवडीमुळे कमलापूर परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर चमकले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत असलेल्या या शाळेने सैनिकी शाळेकडे घेतलेली ही झेप कौतुकास्पद मानली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास तेही राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल येऊ शकतात, हे ऋशांतने दाखवून दिले आहे.

“ऋशांतच्या या यशामागे त्याचे परिश्रम, पालकांचे पाठबळ आणि शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्याने राज्यात प्रथम येणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

शाळा व्यवस्थापन व शिक्षक वृंद, कमलापूर.

ऋशांतच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. देशसेवेच्या दिशेने त्याने टाकलेले हे पहिले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here