पत्रकारांच्या प्रश्नांवर सांगोल्यात मंथन!; ‘द जर्नलिस्ट असोसिएशन’च्या बैठकीत पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी देशव्यापी अभियानाचा निर्धार

0

डिजिटल, आयटी, विधी, पत्रकार प्रशिक्षण, संपादक व स्वतंत्र पत्रकार विभागांचा उत्स्फूर्त सहभाग; नव्या सदस्यांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन

सांगोला ( प्रतिनिधी): पत्रकारांचे प्रश्न, पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि समाजातील ज्वलंत विषयांवर सखोल चर्चा करत द जर्नलिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, सांगोला येथे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या विविध विभागांतील पदाधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत संघटनेच्या डिजिटल विभाग, आयटी विभाग, विधी विभाग, पत्रकार प्रशिक्षण विभाग, संपादक विभाग आणि स्वतंत्र पत्रकार विभागातील पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला. संघटनेच्या वतीने मागील काही दिवसांत हाती घेण्यात आलेल्या विविध अभियानांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळातील संघटनात्मक कार्याची दिशा आणि पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत विचारविनिमय करण्यात आला.

पत्रकारांना वार्तांकन करताना अनेकदा विविध अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना, संपूर्ण देशात पत्रकार सुरक्षा कायदा प्रभावीपणे लागू व्हावा, यासाठी द जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर अभियान सुरू करण्यात आले आहे. पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची भूमिका या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

संघटनेच्या स्वतंत्र पत्रकार विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारितेची आवड असणारे कवी, लेखक, साहित्यिक, युट्युबर तसेच सोशल मीडियावर रील्स तयार करणाऱ्या व्यक्तींनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींनी संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वतंत्र पत्रकार विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे, या उद्दिष्टांसाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

पत्रकारांची एकजूट, सुरक्षित पत्रकारिता आणि समाजहिताचा जागर हीच संघटनेच्या पुढील वाटचालीची प्रमुख दिशा असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here