सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला नगरपरिषदेच्या नियोजन व विकास समितीची बैठक उपनगराध्यक्ष मा. श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बैठकीत शहराच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात विकासकामांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना व नियोजनावरही सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

मॉन्सूनचे आगमन लक्षात घेऊन यावर्षी “आपलं सांगोला, हरित सांगोला” अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक मोकळ्या जागा, उद्याने तसेच इतर योग्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यावर भर देण्यात आला. वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठीही प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.

शहरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिकयांचाविचारकरून विविध मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक व स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

याशिवाय शहर व वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी झाडे, फांद्या व झुडपे यांची छाटणी करून रस्ते सुरक्षित, प्रशस्त आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा झाली
बैठकीदरम्यान शहरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मूलभूत नागरी सुविधा आणि विकासकामांच्या गुणवत्तेबाबत विविध सूचना मांडण्यात आल्या. सर्व विकासकामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राखून काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्ष मा. श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, गटनेते श्री. रमेश जाधव, नगरसेविका सौ. आशादेवी सोमेश यावलकर, श्री. विजय वसंत इंगोले तसेच नगरपरिषदेचे अधिकारी श्री. सचिन पाडे, नगर अभियंता श्री. आकाश गोडसे, श्री. करण सरवदे, श्री. अरिफ मुलाणी, कोरे मॅडम व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सांगोला शहराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी विकासकामे प्राधान्याने हाती घेऊन शहर अधिक स्वच्छ, हिरवेगार, सुरक्षित आणि सुविधायुक्त बनविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



