सांगोला (प्रतिनिधी):स्पोर्ट्स कराटे डो. असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने आणि ‘कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ (KAM) व ‘कराटे इंडिया ऑर्गनायझेशन’ (KIO) यांच्या मान्यतेने, सांगोला येथील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा कराटे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवत कसब पणाला लावले.

या स्पर्धेचे उद्घाटन सांगोला पोलीस ठाण्याचे एपीआय सिकंदर वर्धन यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “आजच्या युगात स्वसंरक्षण ही काळाची गरज बनली आहे. कराटे हा केवळ खेळ नसून शिस्त आणि आत्मरक्षणाचे उत्तम साधन आहे. शासनाने या खेळाचा समावेश क्रीडा प्रकारात केल्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा सकारात्मक उपयोग करून स्वतःची प्रगती साधावी.”

कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शक वाघमारे सर यांनी सांगोल्यातील कराटेच्या ३० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, कराटे आता जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त खेळ आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळात सहभागी होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ही स्पर्धा ‘कता’ आणि ‘कुमिते’ (फाईट) अशा दोन गटांत पार पडली. कराटेचे जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थितांचे आभार मानले. पाहुण्यांचे स्वागत सुनील वाघमारे यांनी केले. राष्ट्रीय पंच निजेंद्र चौधरी यांनी या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.

या जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या यशस्वी खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. हे खेळाडू ९ व १० मे रोजी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



