जागतिक बाजारपेठेची दारे शेतकऱ्यांसाठी खुली!; माणगंगा परिवाराच्या डाळिंब निर्यात चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

सांगोला (प्रतिनिधी): माणगंगा परिवार व पालवी ॲग्रीको यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर आयोजित चर्चासत्र रामकृष्ण गार्डन, सांगोला येथे उत्साहात संपन्न झाले. या चर्चासत्रात APEDA चे माजी सल्लागार आणि निर्यात क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले माननीय श्री. शरद नानापुरे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषिमाल निर्यात आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून चर्चासत्रास प्रारंभ झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी केली.

प्रास्ताविकात श्री. इंगोले यांनी आपल्या भागातील शेतकरी दर्जेदार कृषिमालाचे उत्पादन घेत असून, या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेतही आपला ठसा उमटवावा, या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डाळिंबासह इतर पिकांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा माणगंगा परिवाराचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निर्यात प्रक्रिया आणि जागतिक बाजारपेठेबाबत सविस्तर मार्गदर्शन

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. शरद नानापुरे सर यांनी डाळिंबासह इतर कृषिमालासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. परदेशातील ग्राहक कसे शोधावेत, निर्यातीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, निर्यात प्रक्रिया कशी पूर्ण करावी आणि जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजांनुसार शेतमालाची विक्री कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

भारतामधून युरोपमध्ये कृषिमालाची निर्यात करताना आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया, गुणवत्ता निकष आणि कागदपत्रांची पूर्तता याविषयीही त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम गुणवत्तेचा शेतमाल तयार करून जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निर्यातीसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या चर्चासत्रामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळाली.

शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व विविध वस्तूंचे वाटप

कार्यक्रमाच्या निमित्ताने माणगंगा ॲग्रो मार्टच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेती उपयोगी साहित्य व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये ट्रॅक्टर, शाईन मोटारसायकली, इलेक्ट्रिक स्कूटर, एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर, वॉशिंग मशीन, फवारणी पंप, ताडपत्री यांसह विविध वस्तूंचा समावेश होता. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

या कार्यक्रमास माणगंगा परिवाराच्या चेअरमन सौ. अर्चना ताई इंगोले, संस्थेचे संचालक श्री. विवेक घाडगे सर, श्री. सचिन इंगोले, सौ. रोहिणी इंगोले, श्री. महादेव शिंदे, श्री. पोपट केदार साहेब, श्री. तोडकरी साहेब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकरी या चर्चासत्रासाठी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी माणगंगा परिवार कटिबद्ध

या चर्चासत्राचा शेतकऱ्यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल, असा विश्वास माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना आधुनिक शेती, कृषिमालाची विक्री, निर्यात आणि जागतिक बाजारपेठेतील संधी याबाबत मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी, यासाठी माणगंगा परिवाराच्या वतीने भविष्यातही शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी आवश्यक विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आर्थिक सेवांसोबतच कृषी क्षेत्रातील नव्या संधींची माहिती, बाजारपेठेचे मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here