आयपीएस (IPS) अधिकारी असल्याची बतावणी करत एक तरुण थेट पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्याने आपल्या ‘आयपीएस’ मित्राचा उल्लेख केला, परंतु योगायोगाने तोच खरा अधिकारी समोर आल्याने या बोगस अधिकाऱ्याचे पितळ उघडं पडले. या प्रकरणी सांगोला तालुक्यातील सागर वाघमोडे याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना कशी घडली?
सागर वाघमोडे हा आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत पुणे पोलीस आयुक्तालयात एका वरिष्ठ पोलीस उपायुक्तांना भेटण्यासाठी गेला होता. सामान्य नागरिकांची गेटवर कसून चौकशी होत असताना, हा तरुण थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना, वाघमोडेने आपला ‘बॅचमेट’ असलेला एक आयपीएस अधिकारी मित्र आहे, असे सांगितले आणि त्याने त्या मित्राचे नाव घेतले. हा योगायोग होता की, ज्या अधिकाऱ्याचे नाव वाघमोडेने घेतले, ते खरे आयपीएस अधिकारी त्याच वेळी तेथे उपस्थित होते आणि ते त्यांच्या समोर आले. या अनपेक्षित भेटीमुळे वाघमोडेचा बनाव उघडकीस आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली, ज्यात तो बोगस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ बंडगार्डन पोलिसांना बोलावून तोतया अधिकारी सागर वाघमोडे याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी वाघमोडेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलीस आयुक्तालयात येण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता? तो कोणा-कोणाला भेटला? आणि त्याने यापूर्वीही अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास सध्या बंडगार्डन पोलीस करत आहेत. थेट पोलीस आयुक्तालयात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आयपीएसची बतावणी करण्याचे त्याचे धाडस सर्वांसाठीच आश्चर्याचा विषय ठरले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



