मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना जीवनावश्यक किटचे वाटप; कवींच्या कवितांनी रंगली आनंदाची मैफल!
सांगोला (प्रतिनिधी): वाढदिवस म्हटले की मोठमोठे सेलिब्रेशन, आकर्षक सजावट आणि खर्चिक कार्यक्रम असे चित्र पाहायला मिळते. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत मातृशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक श्री गणेश लवटे यांनी आपला वाढदिवस सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना दीपावली फराळ साहित्य वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. स्वतःच्या आनंदासोबत समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी महादेव कांबळे यांनी आपल्या बहारदार कवितांचे वाचन करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. तसेच कवी संतोष ओवाळ यांनीही आपल्या कवितांच्या माध्यमातून उपस्थितांना साहित्याचा आनंद दिला. कविता, साहित्य आणि मनोरंजनाच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील वातावरण आनंदमय झाले.

यावेळी विस्ताराधिकारी जयंतराव टकले, प्राध्यापक सुरेश लवटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष दिपक ऐवळे, ह.भ.प. प्राध्यापक नामदेव खरात सर, घाडगे साहेब, निगडे सर तसेच मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाढदिवस हा केवळ स्वतःच्या आनंदाचा उत्सव नसून आपल्या आनंदात समाजातील वंचित, गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेण्याची संधी आहे, हा सामाजिक संदेश श्री.गणेश लवटे यांनी आपल्या कृतीतून दिला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



