सांगोला (प्रतिनिधी): भारत सरकारमान्य राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र (भारत) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे खिलारवाडी (ता. सांगोला) परिसरातून आनंद व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, संस्थेचे सल्लागार अॅड. प्रभाकर शेवाळे, राष्ट्रीय संघटक डॉ. गोरख साठे, संस्थेचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक व कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आणि महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी ही निवड केली.

या संस्थेचे सामाजिक कार्य देशातील १२ राज्यांमध्ये सुरू आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विविध उपक्रम तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार वितरण असे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.

प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल हे सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र आहेत. ते सध्या रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे प्राध्यापक, राज्यशास्त्र विभागप्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.

त्यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. किशोरराजे निंबाळकर, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. घनश्याम हराळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



