सामाजिक संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले हे यश प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक: – प्रा प्रसाद खडतरे
सांगोला( प्रतिनिधी): सांगोला आणि चिपळूण या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ बस सेवेचा शुभारंभ आज सांगोला एसटी स्थानकावर अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणात पार पडला. या नवीन बस सेवेमुळे सांगोला आणि परिसरातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्यासाठी आणि हक्काची सोय उपलब्ध झाली असून, प्रवाशांनी या उपक्रमाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले आहे.

बस स्थानकावर चिपळूण बसचे पूजन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सचिव निलकंठ वसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी या बसचे चालक -वाहक यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला- विटा -कराड चिपळूण मार्गावर थेट बस सेवा सुरू व्हावी, यासाठी शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना आणि नागरिक सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. या सामाजिक संघटनेच्या अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून ही एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.याप्रसंगी बोलताना प्रा. प्रसाद खडतरे म्हणाले, “सांगोला-चिपळूण कोकणकन्या एक्सप्रेस सुरू होणे हा या भागातील जनतेसाठी ऐतिहासिक क्षण आहे. अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले हे यश प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. या गाडीमुळे केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर सांगोला आणि कोकण प्रांतातील व्यापारी, सांस्कृतिक व सामाजिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.”

शुभारंभाच्या वेळी पहिल्या प्रवाशांचे स्वागत पेढे भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन एसटी प्रशासनाचे अधिकारी योगेश गवळी साहेब, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. टी स्थानक परिसर फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवला होता. प्रवाशांच्या चेहऱ्यावर थेट बस सेवा सुरू झाल्याचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. ही एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, वाहतुकीची मोठी कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड , हरी बाबर, महामंडळातील चालक, वाहक स्थानिक नागरिक, सामाजिक संघटनेचे मकरंद पाटील, अनिल तारळकर, प्रकाश खडतरे, अशोक वाघमारे, चंद्रकांत इंगोले, प्रविण पवार,राजवर्धन शिंदे, महेश सुर्वे पदाधिकारी आणि एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन, आभार निलकंठ शिंदे सर यांनी केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



