पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे काळाची गरज -ॲड. अयुब पटेल
*सांगोला, दि. ६ सप्टेंबर २०२६ : पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने होत असलेले तांत्रिक बदल, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, पत्रकारांचे कायदेशीर अधिकार आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य याबाबत पदाधिकाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने द जर्नलिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सांगोला येथे रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश डी. यादव आणि विधी विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस अॅड. अयुब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील संघटनेच्या स्वतंत्र पत्रकार विभाग, संपादक विभाग, पत्रकार प्रशिक्षण विभाग, डिजिटल मीडिया विभाग आणि आयटी सेल विभागातील पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यशाळेच्या विविध सत्रांमध्ये पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.रोहित हेगडे यांनी ‘डिजिटल मीडिया आणि पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन करताना सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मचा पत्रकारितेसाठी प्रभावी वापर, डिजिटल पत्रकारितेतील बदल आणि आधुनिक माध्यमांची कार्यपद्धती याबाबत माहिती दिली.

मिनाज खतीब यांनी ‘प्रिंट मीडिया आणि पत्रकारिता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रिंट माध्यमांची विश्वासार्हता, बातमी लेखनातील अचूकता, पत्रकारितेची मूल्ये आणि बदलत्या काळातील माध्यमांसमोरील आव्हाने याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर राहुल बंदपट्टे यांनी सखोल माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा पत्रकारितेमध्ये होणारा वापर, डिजिटल साधने आणि प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेल्या तांत्रिक बदलांचे महत्त्व स्पष्ट केले.संघटनेत कार्यरत असताना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या विविध अडीअडचणी, कायदेशीर प्रश्न आणि पत्रकारितेशी संबंधित कायदेशीर बाबी यावर अॅड. लक्ष्मीकांत पाचंगे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘सामाजिक समस्या आणि संघटन विस्तार’ या विषयावर भैरवनाथ बुरांडे यांनी चर्चासत्र घेतले. या चर्चासत्रात पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली.

*कार्यशाळेच्या समारोपाच्या सत्रात प्रश्नोत्तर व मुक्त संवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी पत्रकारिता, डिजिटल मीडिया, कायदे, तंत्रज्ञान आणि संघटनात्मक कामकाजासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले.पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्यात याव्यात आणि पत्रकार व पदाधिकाऱ्यांना पत्रकारिता, कायदा, डिजिटल मीडिया तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबाबत वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ज्ञानवृद्धी, प्रशिक्षण आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी द जर्नलिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग व सहकार्य केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



