‘2020 ची चूक यावेळी पुन्हा होणार नाही’ – दत्तात्रय सावंत

0

अपक्ष आणि रासपकडून दोन अर्ज दाखल

सांगोला (प्रतिनिधी) :पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सावंत यांनी एक अपक्ष आणि एक राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) वतीने, असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय सावंत यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना दत्तात्रय सावंत म्हणाले, “कोणताही राजकीय पक्ष माझ्यासाठी विरोधक नाही. मी गेल्या 29 वर्षांपासून शिक्षण चळवळीत कार्यरत आहे. मतदारसंघातील प्रत्येक शिक्षकासोबत माझा वैयक्तिक संपर्क आहे. 2020 साली झालेली चूक शिक्षक बांधवांकडून यावेळी पुन्हा होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि शिक्षण चळवळीसाठी आपण सातत्याने काम केले असून, यावेळी सामान्य शिक्षक आपल्या मतदानातून राजकीय पक्षांना उत्तर देतील, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.

“बलाढ्य राजकीय पक्षांना सामान्य शिक्षक यावेळी मैदानातून उत्तर देतील आणि शिक्षण चळवळीला साथ देतील,” असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, सावंत यांनी अपक्ष तसेच रासपकडून अर्ज दाखल केल्याने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात प्रचाराला वेग येणार असून, शिक्षक मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here