५० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; रुग्णांना मोफत औषधांचे वाटप
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील सुप्रसिद्ध आलदर हॉस्पिटल यांच्या वतीने दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उदनवाडी, सांगोला येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीसोबतच आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधेही देण्यात आली. त्यामुळे परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरादरम्यान डॉ. महावीर आलदर (एम.डी., बालरोग तज्ज्ञ) यांनी विद्यार्थ्यांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. बालकांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या, आरोग्याची काळजी तसेच वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यांची सविस्तर माहिती डॉ. महावीर आलदर यांनी उपस्थितांना दिली. शासनाच्या या आरोग्य योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

या आरोग्य शिबिरास धनंजय धबधबे, अर्चना धबधबे, दिनकर गाडे सर, विकास वलेकर, दिलखुष आलदर, सुहास माळी, सुनील बुरुंगे, डॉ. पवन शिरसाट, रुपाली बुरुंगे आदी मान्यवर तसेच हॉस्पिटल स्टाफ, पालक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे वेळेवर निदान करणे आणि शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



