मायक्रो फायनान्सच्या सक्तीच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती द्या; शशिकांत हातेकर

0

दुष्काळात महिलांच्या हाताला काम नाही; मग कर्जाचा हप्ता भरणार तरी कसा?

सांगोला (प्रतिनिधी): दुष्काळामुळे शेतीची कामे ठप्प, रोजगाराच्या संधी कमी आणि घरातील उत्पन्नाचे मार्ग आटलेले असताना ग्रामीण भागातील महिलांवर मायक्रो फायनान्सच्या कर्जहप्त्यांचा ताण वाढत आहे. हाताला काम नसताना साप्ताहिक व मासिक हप्ते भरणे कठीण झाले असून, कर्जदार महिलांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“मायबाप सरकार, ऐकताय ना? उत्पन्नाचे मार्गच बंद असताना महिलांनी कर्जाचे हप्ते भरायचे तरी कसे?” असा सवाल उपस्थित करत दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स संस्थांच्या सक्तीच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बचतगट व इतर माध्यमातून मायक्रो फायनान्स संस्थांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, दुष्काळामुळे रोजगार व उत्पन्नावर परिणाम झाल्याने नियमित हप्ते भरणे त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत वसुलीचा तगादा वाढल्यास कुटुंबांवरील आर्थिक संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

दुष्काळग्रस्त नागरिकांना शासनाकडून विविध सवलती व मदतीच्या उपाययोजना केल्या जात असताना आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना मायक्रो फायनान्सच्या हप्त्यांबाबतही दिलासा मिळणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सक्तीची वसुली थांबवावी, हप्त्यांचे पुनर्नियोजन करावे आणि व्याजाबाबत सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने मायक्रो फायनान्स संस्थांची बैठक घेऊन कर्जदार महिलांना दिलासा देण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत. दुष्काळात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांवर कर्जवसुलीचा अतिरिक्त मानसिक व आर्थिक ताण टाकू नये, अशी भूमिका सांगोला-गौडवाडीचे युवा नेते तथा मैत्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शशिकांत बळीराम हातेकर यांनी मांडली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here