“ते निवडून आले आहेतच!” उदय सामंतांचा विश्वास; सचिन सानप यांना शिक्षक संघटनांचा जाहीर पाठिंबा

0

सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या प्रचार मेळाव्याला सुमारे दीड हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या भव्य प्रतिसादावर भाष्य करताना महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी, “या उपस्थितीतूनच शिक्षकांना शिक्षकांचाच आमदार हवा आहे, ही भावना स्पष्टपणे दिसून येते,” असे प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे सचिन नवनाथ सानप यांच्यावर विश्वास ठेवत मा. उपमुख्यमंत्री शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेचा अधिकृत पाठिंबा दिला आहे.

महायुतीमध्ये यामुळे कोणताही तणाव निर्माण होणार नसून, शिक्षक मतदारसंघात ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच, शिवसेना शिक्षक आघाडीचे मंगेश चिवटे यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेत पक्षाच्या निर्णयाचा मान राखत सचिन सानप यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

मेळाव्यातील महत्त्वपूर्ण घडामोड म्हणजे शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री. कपिल पाटील यांनी सचिन सानप यांना जाहीर पाठिंबा दिला. याशिवाय जुनी पेन्शन चळवळीतील प्रतिनिधी, प्राध्यापक संघटना तसेच शिक्षण परिषदेनेही सचिन सानप यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.

शिक्षण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यांतील शिक्षकांकडून सचिन सानप यांनाच प्रथम पसंतीचे मतदान मिळेल, असा विश्वास व्यक्त केल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकारांनी ” सचिन सानप निवडून येतील का?” असा प्रश्न विचारला असता, उदय सामंत यांनी आत्मविश्वासाने उत्तर देत, “ते निवडून आले आहेतच,”असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here