राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
रवींद्र धंगेकरही सानप यांच्या प्रचारात उतरणार असल्याची भूमिका
सांगोला (प्रतिनिधी): पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, अपक्ष उमेदवार प्रा. सचिन नवनाथ सानप यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, शिवसेनेच्या अधिकृत पाठिंब्याबाबत स्पष्टता येणे अद्याप महत्त्वाचे ठरणार आहे.

‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’ ही टॅगलाईन घेऊन प्रा. सचिन सानप यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रा. सचिन सानप यांच्या प्रचारात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सानप यांच्या प्रचाराला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ताकद मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रा. सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. आगामी काळात चिवटे हे सानप यांच्या प्रचारात सहभागी होणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात प्रा. सचिन सानप यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सानप यांच्या उमेदवारीला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एकीकडे शिक्षकांच्या प्रश्नांवर आधारित प्रचार, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून मिळणारा पाठिंबा, यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष सहभाग कितपत वाढतो, तसेच या घडामोडींचा शिक्षक मतदारांवर काय परिणाम होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
एकूणच, प्रा. सचिन सानप यांच्या उमेदवारीला शिवसेनेची ताकद मिळणार का आणि त्यातून निवडणुकीचे राजकीय गणित बदलणार का? या प्रश्नांची उत्तरे आगामी घडामोडींमधून समोर येणार आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



