सांगोला (प्रतिनिधी) :शेतकरी सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे आणि ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार प्रा. राजेंद्र ठोंबरे यांच्यात नुकतीच ग्रंथभेटीची अनोखी साहित्यिक देवाणघेवाण पार पडली. पुस्तकांच्या या स्नेहभेटीमुळे सांगोल्याच्या साहित्यिक वर्तुळात एक प्रसन्न आणि प्रेरणादायी सोहळा अनुभवायला मिळाला.

या प्रसंगी प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी स्वतः लिखित आणि ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांनी संपादित केलेली आपली मौलिक साहित्यसंपदा प्रा. राजेंद्र ठोंबरे यांना सप्रेम भेट दिली. यामध्ये ‘आठवणीतील भाई गणपतराव देशमुख’, ‘चंदन’, ‘भाई जगन्नाथ लिगाडे स्मरणगाथा’ आणि ‘माझा जीवनप्रवास’ या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे.

या स्नेहभेटीला प्रतिसाद देत प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनीही ठोंबरे परिवाराची ग्रंथसंपदा प्रा. नानासाहेब लिगाडे यांना भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये प्रा. ठोंबरे लिखित ‘विद्यामंदिरचे पुजारी’ व ‘कृष्णायन’ या पुस्तकांसह सौ. मनिषा ठोंबरे रचित ‘काव्यपूर्ती’ आणि ‘भावगंध’ या काव्यसंग्रहांचा समावेश होता.

केवळ औपचारिकता न राहता विचारांची आणि साहित्याची ही देवाणघेवाण अत्यंत आत्मीयतेने पार पडली. या अद्भुत साहित्यिक सोहळ्याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक डॉ. योगेश माळी, संकेत ठोंबरे उपस्थित होते. दोन पिढ्यांतील आणि विविध क्षेत्रांतील लेखकांचा हा संवाद उपस्थितांसाठी पर्वणी ठरला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



