शासनाच्या परिपत्रकानुसार विविध उपक्रमांचे आयोजन बंधनकारक; संविधान दिन साजरा न करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
सांगोला (प्रतिनिधी): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संविधान दिन साजरा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे तसेच विविध शासकीय कार्यालयांनी संविधान दिन उत्साहात आणि व्यापक स्वरूपात साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सवांतर्गत ‘घर घर संविधान’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या शासन परिपत्रकानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे, आश्रमशाळा तसेच ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

यामध्ये प्रत्येक शाळा व महाविद्यालयाच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, दररोज प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे, विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत उपलब्ध करून देणे, संविधान सभा, संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये व अनुच्छेद याबाबत व्याख्याने आयोजित करणे, कार्यशाळा घेणे, संविधान दिनानिमित्त पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, निबंध लेखन, भाषण, वादविवाद व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

संविधान दिन केवळ औपचारिकता नको!
भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा अधिकार दिला आहे. त्यामुळे संविधान दिन हा केवळ एक दिवसाचा औपचारिक कार्यक्रम न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात संविधानाबद्दल आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा उपक्रम ठरला पाहिजे.

मात्र शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही काही शाळा, महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्था संविधान दिन साजरा करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर अशा प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित संस्था व जबाबदार अधिकारी यांच्यावर प्रशासनाने नियमानुसार चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सांगोला तालुक्यातील शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिन साजरा होत असल्याची खात्री करावी. प्रत्येक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल व छायाचित्रे मागवून त्याची पडताळणी करावी. शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या संस्थांना जबाबदार धरून योग्य ती कारवाई करावी.
संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील एकही शाळा, महाविद्यालय किंवा शासकीय संस्था संविधान दिन साजरा करण्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



