राज्य गुणवत्ता यादीत पाचवा, जिल्ह्यात प्रथम क्रमांक; सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात अभिमानाची भर
सांगोला (वार्ताहर):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ७वी) परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथील विद्यार्थी कुमार अर्णव चतुरगुण औताडे याने राज्य गुणवत्ता यादीत ५वा क्रमांक, तर सोलापूर जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात कुमार अर्णव चतुरगुण औताडे याचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अर्णवचे पालक चतुरगुण औताडे सर व मार्गदर्शक शिक्षक व अशपाक काझी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी माननीय जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, मान्यवर, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अर्णवने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश संपादन केले असून राज्य गुणवत्ता यादीत पाचवा आणि सोलापूर जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणे ही सांगोला विद्यामंदिर प्रशालेसह संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षात अर्णवने मिळविलेले हे यश संस्थेसाठी विशेष अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे.
संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यार्थ्याने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करून शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करणे ही या ऐतिहासिक वर्षाला लाभलेली अभिमानाची सुवर्ण किनार आहे.अर्णवचे हे यश संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधिक बळ देणारे असून, अमृत महोत्सवी वर्षातील एक अविस्मरणीय शैक्षणिक कामगिरी म्हणून त्याची नोंद निश्चितच केली जाईल.

अर्णवच्या या यशामध्ये त्याचे पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच शाळेचे शैक्षणिक वातावरण यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या उज्ज्वल यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके, सौ.शीलाकाकी झपके यांच्यासह मुख्याध्यापक चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे, सौ.शुभांगी घोंगडे, संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे, प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख सिताराम राऊत शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्गाने अभिनंदन केले.
कुमार अर्णव चतुरगुण औताडे याने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, अमृत महोत्सव वर्षात मिळालेल्या या यशामुळे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या शैक्षणिक यशाची परंपरा अधिक समृद्ध झाली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



