सांगोला (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि माणुसकीचा सण. मात्र, समाजातील प्रत्येकाच्या आयुष्यात हा आनंद सारख्याच प्रमाणात पोहोचतो असे नाही. याच सामाजिक जाणिवेतून सांगोला विद्यामंदिर शिक्षक वर्ग, परिवर्तन फाऊंडेशन सांगोला आणि मराठा मोबिलिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथील वा. बा. नवरंगे बालकाश्रमातील मुला-मुलींसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर आदर्श निर्माण करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, दि. ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी या सर्वांच्या वतीने बालकाश्रमाला सदिच्छा भेट देण्यात आली. आश्रमात लहान-मोठी अशी एकूण ४५ मुले-मुली वास्तव्यास आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा, शैक्षणिक आवश्यकता आणि जीवनावश्यक सुविधांचा विचार करून या उपक्रमांतर्गत आश्रमासाठी एक महिन्याचा संपूर्ण किराणा, धान्य तसेच इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक मदत देण्यात आली. यासोबतच दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी आश्रमाच्या अधीक्षिका सौ. राजश्री गाडे मॅडम व इतर संचालकांनी उपस्थितांना आश्रमाची सविस्तर माहिती दिली. आश्रमातील मुलांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या गरजा, संगोपन आणि त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती समजावून सांगितली. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या सहवासातील काही क्षणांनी उपस्थितांना माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करून दिली.

या उपक्रमासाठी सांगोला विद्यामंदिरचे सहशिक्षक व या सामाजिक उपक्रमाचे संकल्पक श्री. नागेश भोसले सर, श्री. किरण घोंगडे सर, परिवर्तन फाऊंडेशन व मराठा मोबिलिटीचे संस्थाध्यक्ष कु. ओंकार साळुंखे, कु. संदीप व्होनमाने, श्री. सौरभ व्होनमाने, श्री. राहुल यादव, कु. अभिषेक साळुंखे, कु. अजित कदम, कु. काजल कदम, कु. सुप्रिया भुईटे, कु. मृणाली अडसूळ आणि कु. सारिका सोनलकर उपस्थित होते.

या उपक्रमाला सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून दिग्विजय चव्हाण, अमोल रणदिवे, दत्तात्रय पाटील, किरण घोंगडे, प्रतीक कसबे आणि श्रुती कुलकर्णी यांनी आर्थिक योगदान दिले तसेच परिवर्तन फाऊंडेशनच्या अनेक दानशूर सदस्यांनी आर्थिक स्वरूपात मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळेच हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

यावेळी उपक्रमाचे संकल्पक श्री. नागेश भोसले सर यांनी उपस्थितांना समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने आपल्या परीने गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी केलेली छोटीशी मदतदेखील त्यांच्यासाठी खूप मोठा आधार ठरू शकते.”

दिवाळीच्या प्रकाशपर्वात बालकाश्रमातील मुलांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याचा हा प्रयत्न केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता माणुसकी, सामाजिक जाणीव आणि आपुलकीचा संदेश देणारा ठरला. समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हीच खऱ्या अर्थाने दिवाळीची खरी भेट आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



