सांगोला (प्रतिनिधी):भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपत शिवकृपा प्रतिष्ठान, सांगोला आणि आलदर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम २६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.

या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने जन्मलेल्या बाळापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे लहान मुलांमध्ये जाणवणारे आजार, कुपोषण आणि इतर शारीरिक समस्यांचे वेळेत निदान व्हावे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात येणाऱ्या सर्व बालकांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे देखील वितरित केली जाणार आहेत.
हे शिबीर सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसी, ता. मंगळवेढा येथे होणार आहे.

या शिबिरामध्ये रुग्णांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पिवळे, केसरी व पांढरे रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सवलतींची माहिती यावेळी देण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांनी सोबत आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) व आवश्यक कागदपत्रे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिरसी गावातील आणि परिसरातील गावांमधील नागरिकांनी आपल्या मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. नाव नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी आयोजकांच्या ९०२९० ४४००९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवकृपा प्रतिष्ठान, सांगोला व आलदर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून आरोग्य सेवेचा हा यज्ञ शिरसी सारख्या ग्रामीण भागात राबवला जात असल्यामुळे सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


