माढा (प्रतिनिधी):रयत शिक्षण संस्थेच्या माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रेय मारुती काळेल यांना ब्रिटनचे (यूके) डिझाईन पेटंट प्राप्त झाले असून, भारतीय डिझाईन पेटंटसाठीही मंजुरी मिळाली आहे.

ब्रिटनच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांच्या नावे ‘राजकीय जनमत विश्लेषणासाठी संगणक उपकरण’ या आराखड्यासाठी यूके डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहे. या डिझाईनचा क्रमांक ६५५०८४१ असा असून, या आराखड्याला अधिकृत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय डिझाईन वर्गीकरणाच्या वर्ग १४ आणि उपवर्ग ०२ अंतर्गत रेकॉर्डिंग, दूरसंचार व डेटा प्रोसेसिंग उपकरणांच्या श्रेणीत या आराखड्याची नोंद झाली आहे.

तसेच भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागांतर्गत येणाऱ्या कोलकत्ता येथील पेटंट आणि डिझाईन कार्यालयाकडे सादर केलेल्या भारतीय डिझाईन पेटंट अर्जाची (अर्ज क्रमांक ५२२७०५-००१, सीबीआर क्रमांक २२५२२३) नोंदणी करण्यात आली होती. ए आय आधारित स्वयंचलित बँकिंग सेवा सोयीस्कररित्या उपलब्ध करून देणे या संदर्भातील पेटंट मंजूर झाले आहे.

राज्यशास्त्र विषयातील संशोधनाला आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाची जोड देत प्रा. डॉ. दत्तात्रेय काळेल यांनी मिळवलेल्या या दोन्ही पेटंटच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, सचिव माननीय किशोर राजे निंबाळकर, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील, प्राचार्य प्रो. डॉ. घनश्याम हराळे, प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे व प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



