महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या, रविवार दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरात घेतली जाणारी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडीत प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न फुटल्याचे उघडकीस आल्याने हा अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आज २७ जून रोजी पहाटे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहिती असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पडताळणी केली असता, संशयितांकडे आढळलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात उद्या एकूण १,०२८ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे समोर आल्याने परीक्षा परिषदेने कोणतीही जोखीम न पत्करता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. “कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परिषदेचा आग्रह असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,”असे परीक्षा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

TET परीक्षेच्या नवीन तारखेबाबतची आणि पुढील सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



