विराज केदारचे राष्ट्रीय गणित स्पर्धेत घवघवीत यश; मुलाखतीत १०० टक्के गुणांसह देशात ७६ वा क्रमांक
कमलापूर (प्रतिनिधी) :जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कमलापूर येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कुमार विराज जयंत केदार याने राष्ट्रीयअखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्था कौशल्य विभाग नवी दिल्ली आणि आयआयटी मुंबई यांच्या विद्यमाने घेतल्या जाणाऱ्या रामानुजन मॅथ्स चॅलेंज परीक्षा या गणित स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. लेखी परीक्षेत ८६.६७ गुण मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विराजने ५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मुलाखतीत १०० टक्के गुण मिळवत संपूर्ण भारतात ७६ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे कमलापूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील या गणित स्पर्धेत विराजने इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली होती. लेखी परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने मुलाखतीच्या फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर मुलाखतीतही १०० टक्के गुण मिळवत त्याने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.

विराज केदार हा सेवानिवृत्त शिक्षक श्री. तानाजी तुकाराम केदार यांचा नातू आणि डॉ. जयंत तानाजी केदार यांचा चिरंजीव आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना विराजने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

विराजच्या या यशाबद्दल आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही विराज आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कमलापूरचे मुख्याध्यापक श्री. बशीर मुलाणी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अर्जुन बजरंग पुजारी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विराजचे अभिनंदन केले. तसेच कमलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आप्पासाहेब पवार, नाझरे बीटचे विस्तार अधिकारी श्री. सुयोग नवले आणि गटशिक्षणाधिकारी श्री. निलख साहेब यांनीही विराजचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विराजच्या या उज्ज्वल यशामुळे कमलापूरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



