सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व युवा नेते डॉ. अनिकेतजी (भैय्या) देशमुख यांचा वाढदिवस यावर्षी ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी, युवक व समाजाच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध शैक्षणिक, कौशल्यविकास, रोजगार, क्रीडा व संशोधनाधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘प्रेरणा दिना’निमित्त रविवार, दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी सांगोला तालुका मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दि. 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत रोजगार मेळावा व कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विविध 10 नामांकित कंपन्या व बँका सहभागी होणार आहेत. तालुक्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने दि. 3 ऑक्टोबर रोजी 40 दिवसीय सहाय्यक इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण कोर्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दि. 5 ऑक्टोबर रोजी ‘मशरूम शेती व व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रोजच्या आहारातील आळंबी (मशरूम) सेवनाचे शास्त्रीय व वैद्यकीय महत्त्व या विषयावर दि. 6 व 7 ऑक्टोबर रोजी द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘प्रेरणा दिना’चे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वर्गीय डॉ. गणपतरावजी देशमुख मेरिट स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचे वतीने रंगभरण, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
या सर्व उपक्रमांचा पारितोषिक व गौरव समारंभ शनिवार, दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे सन्माननीय सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास डॉ. सर्जेराव पाटील, प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड.), कमलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सत्कारमूर्ती डॉ. अनिकेतजी देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसाला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता विद्यार्थ्यांना शिक्षण, युवकांना कौशल्य व रोजगार, गुणवंतांना प्रोत्साहन आणि समाजाला विकासाची दिशा देणारा ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. या विविध उपक्रमांमध्ये तालुक्यातील विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धसाडे तसेच उपमहाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. केशव माने यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



