प्रवाशांनी नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा; अक्कलकोट व गाणगापूर थांब्यासाठी पाठपुरावा सुरू :- अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी): रेल्वे क्र 01451 कोल्हापूर -सोलापूर – कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वेचे सांगोल्यात शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. आजपासून नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी रेल्वे सेवेचे सांगोला येथे अशोक कामटे रेल्वे प्रवासी संघटना, सांगोला वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सणासुदीच्या काळात, विशेषतः दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवासी नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

कोल्हापूर, मिरज, सांगोला ,पंढरपूर, सोलापूर आणि कलबुर्गी या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही रेल्वे सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार असून, नागरिकांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन शहीद अशोक कामटे संघटना यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी सांगितले की, प्रवाशांनी नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा;या रेल्वेला अक्कलकोट व गाणगापूर येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या दोन्ही धार्मिक स्थळांवर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे या रेल्वेला अक्कलकोट व गाणगापूर येथे थांबा मिळाल्यास प्रवाशांसह भाविकांना मोठा फायदा होणार आहे.सकाळच्या सत्रात नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या रेल्वेचे पूजन उपाध्यक्ष मकरंद पाटील, प्रकाश खडतरे , अशोक वाघमारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच इंजिनचे लोको पायलेट चंदेश्वर कुमार, समाधान गोसावी व रेल्वेचे गार्ड संतोष गोफणे स्टेशन मास्तर निरंजन सिंह यांचा शाल, श्रीफळ देऊन कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत, मुकुंद हजारे व अनिल तारळकर यांनी सत्कार केला. सदरील रेल्वे सेवा कोल्हापुरातून सकाळच्या सत्रातून थेट सुरू झाल्याने सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक ,पर्यटक प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्याचे सांगून या पुढील काळात सदरील रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्याकरता कामटे संघटनेचा पाठपुरावा सुरू असल्याचे निळकंठ शिंदे सर यांनी सांगितले. तसेच एसटीच्या तुलनेत या रेल्वेचे तिकीट दर कमी असल्याने प्रवाशांची आर्थिक खर्चाची व वेळेची मोठी बचत होणार असल्याचे सांगितले.

तसेच सांगोल्यातून चढ -उतार करणाऱ्या प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन कामटे संघटनेच्या वतीने स्वागत करून प्रवासाकरता शुभेच्छा दिल्या.यावेळी सांगोला शहरातील रेल्वे प्रवासी संघटनेचे बंडू नाना खडतरे,बाळू निमकर,रोहित पालसानडे,विक्रम पानसाडे,राजेंद्र पाटील,नागरीक , व्यापारी रेल्वेच्या स्वागताकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक कामटे संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, तसेच सांगोला रेल्वे स्टेशन येथील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुकुंद हजारे यांनी केले.

मिरज -कुर्डूवाडी दरम्यान सांगोल्यातून सकाळी 8.30 वाजता रेल्वे नंतर किमान 10 तास रेल्वे सेवा उपलब्ध नव्हती पण अशोक कामटे संघटनाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या रेल्वेचा पर्याय सकाळी 10.50 वाजता मिळाल्याने प्रवाशांची पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर कडे व परतीच्या प्रवासात कोल्हापूरकडे जाण्याकरिता 11.55 वाजता सोय झाली आहे, संघटनेच्या पाठपुराव्याबदल अभिनंदन
मयूर ढोले, प्रवासी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



