वतनी जमिनींच्या संरक्षणासाठी १९ नोव्हेंबरला तहसीलदारांना निवेदन: बापूसाहेब ठोकळे

0

वतनी जमिनीच्या मागणी व संरक्षणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये महार व रामोशी समाजाच्या ऐतिहासिक वतनी जमिनी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी विविध कंपन्यांकडून अत्यल्प दरात खरेदी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या व्यवहारांमुळे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या समाजातील अनेक कुटुंबांवर पुन्हा भूमिहीन होण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. ब्रिटिश काळात गावाची सेवा आणि विविध सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या मोबदल्यात मिळालेल्या वतनी जमिनी कालांतराने शासनाच्या ताब्यात गेल्या आहेत.त्यावर मूळ वतनदार कुटुंबाचा अधिकार आहे. त्या जमिनी मूळ वतनदार कुटुंबांना परत मिळाव्यात आणि उपलब्ध वतनी जमिनींचे संरक्षण व्हावे, या मागण्यांसाठी वतनी जमीन संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सांगोला तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात येणार अस्ल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.

महार व रामोशी समाजाच्या वतनी जमिनी या केवळ मालमत्ता नसून पिढ्यान्‌पिढ्यांच्या संघर्षातून प्राप्त झालेला ऐतिहासिक वारसा आणि अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहेत. तालुक्यातील बहुतांश वतनी जमिनी कोरडवाहू असून सिंचन सुविधा, भांडवल, आधुनिक कृषी अवजारे आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांची उत्पादकता मर्यादित राहिली आहे. अशा परिस्थितीत या जमीनधारकांना शेती विकासासाठी आवश्यक मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांच्या जमिनी कंपन्यांकडून खरेदी केल्या जात असल्याने समाजाच्या जमीन हक्कांबाबत चिंता निर्माण झाली आहे.

सौरऊर्जा निर्मिती ही काळाची गरज असली तरी तिच्या नावाखाली स्थानिक जमीनमालकांचे हक्क बाधित होता कामा नयेत. त्यामुळे जमिनींची कायमस्वरूपी विक्री करण्याऐवजी दीर्घकालीन भाडेपट्ट्याचा (लीज) पर्याय स्वीकारावा, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली वतनाच्या जमिनींची सुरू असलेली खरेदी-विक्री व हस्तांतरण प्रक्रिया तात्काळ थांबवून झालेल्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, शासनाच्या ताब्यात असलेल्या महार व रामोशी वतनाच्या जमिनी मूळ हक्कदार कुटुंबांना परत कराव्यात, दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी शासनाकडून दिले जाणारे सर्व लाभ व सुविधा या वतनी जमीनधारकांनाही लागू कराव्यात, प्रत्येक गावातील वतनी जमिनींना गटशेतीचा दर्जा देऊन त्या उत्पादक व उपजाऊ करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी, तसेच वतन जमीनधारकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र शेती विकास धोरण लागू करावे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय कृषी अवजारे, आधुनिक यंत्रसामग्री, सिंचन सुविधा आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.

वतनी जमिनींचे संरक्षण, मूळ हक्कदारांना जमिनींची पुनर्प्राप्ती आणि जमीनधारक कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या या लढ्यात सर्व वतनी जमीनधारक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि न्यायप्रिय नागरिकांनी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सांगोला तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वतनी जमीन संघर्ष समितीच्या वतीने बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here