
कोळे येथे पालावर राहणाऱ्या बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; कुटुंबीयांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी
सांगोला (प्रतिनिधी) : राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, पालावर वास्तव्यास असणारे बांधव आणि ऊसतोड कामगार यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. अशा संकटाच्या काळात वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोळे (ता. सांगोला) येथे पालावर वास्तव्यास असलेल्या दुष्काळग्रस्त बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.

राज्याचे मुख्यमंत्री तथा मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या आनंदात शेतकरी बांधवांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येकाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे संवेदनशील आवाहन केले होते. या आवाहनातून प्रेरणा घेत चेतनसिंह केदार यांनी कोळे येथे पालावर राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. तसेच दिवाळीच्या सणात त्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांना आपलेपणाची जाणीव करून दिली.

वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद केवळ शुभेच्छा आणि सत्कार स्वीकारण्यात नसून, आपल्या माध्यमातून एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, गरजू कुटुंबाला आधार मिळावा आणि समाजातील वंचित घटकांनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यातच असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, हाच लोकसेवेचा खरा संकल्प असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

या उपक्रमाप्रसंगी संभाजी तात्या आलदर, अॅड. सचिन देशमुख, अमोल साखरे, संतोष करांडे, शिवाजी आलदर, हरीभाऊ सरगर, हरी आलदर (बोबडे), उद्धव करांडे, दादासाहेब कोळेकर, नवनाथ हातेकर, अनिल येडगे, आकाश सकट, विक्रम माने, निवास पांढरे, वैभव सोनवणे, विनोद कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



