सोलापूर (प्रतिनिधी): राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना सोलापूर जिल्हा प्रशासनाने चारा उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील चारा भविष्यात कमी पडू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यात चारा विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आदेश जारी केले आहेत.

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील उभी पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात सध्या अंदाजे 120 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील सुमारे 90 गावांमध्ये केवळ एक महिन्याचा चारा शिल्लक असल्याने भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यात विक्री अथवा वाहतूक करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.जिल्ह्याबाहेर चारा विक्री किंवा वाहतूक केल्याचे आढळल्यास संबंधितांवर सीआरपीसी कलम 144 आणि बीएनएस कलम 163 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्ह्यात पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेजिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील चारा मोठ्या प्रमाणात बाहेर गेल्यास पशुधनासाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.तसेच यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता साखर कारखान्यांनी ऊस गाळप उशिराने सुरू करावे, तसेच जिल्ह्यातील ऊस इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यात विक्री करू नये, अशी मागणीही काही शेतकऱ्यांनी केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



