सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय वातावरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत असतानाच, भारतीय जनता पार्टी (भाजप), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गट यांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या निकालावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही महत्त्वपूर्ण जाहीर सभा रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.

निवडणुकीच्या ऐन मोक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही शहर विकास आघाडीसाठी मोठे शक्तीप्रदर्शन ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे या सभेतून केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि सांगोला शहराच्या विकासाची रूपरेषा मतदारांसमोर मांडण्याची शक्यता आहे. याशिवाय, विरोधकांच्या भूमिकेवरही ते सडेतोड भाष्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सांगोला शहर विकास आघाडीचे बळ वाढवण्याचा प्रयत्न
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि साळुंखे पाटील गटाची आघाडी ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या आघाडीच्या उमेदवारांना एकत्रितपणे पाठिंबा दर्शवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत आणि उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा निर्धार पक्का करावा, असे आवाहन केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



