धायटी येथे सामाजिक न्याय दिन व भटके-विमुक्त मेळावा उत्साहात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील भटका-विमुक्त समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आजही मागास व उपेक्षित राहिला असून घर, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि जीवनाधाराच्या मूलभूत गरजांपासून हा समाज मोठ्या प्रमाणात वंचित आहे. अशिक्षितपणा, माहितीचा अभाव आणि आवश्यक कागदपत्रांची कमतरता यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार बाबसाहेब देशमुख यांनी केले.धायटी येथे संविधान संवादक यांच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय दिन व भटके-विमुक्त मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर ठोकळे होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, सागर पाटील, माजी पोलीस आयुक्त भरत शेळके, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, मोहन आलदर, दीपक गोडसे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते, प्रशांत कांबळे, दलित मित्र प्रभाकर कसबे, हरिश्चंद्र चौगुले, सुवर्णाताई नवले, सरपंच आशाताई, लक्ष्मण घनसरवाड, डॉ. शिवराज भोसले, तुकाराम इंगोले, नंदू मोरे, शर्मिला केदार, रघुनाथ गुजले, विजय गुजले, शिवाजी इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार देशमुख पुढे म्हणाले की, भटक्या-विमुक्त समाजामध्ये घर व घरजागेचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. शिक्षणाचा अभाव आणि कागदपत्रांची अपुरी उपलब्धता ही या समाजाच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत. या सर्व प्रश्नांचा धोरणात्मक पातळीवर विचार करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. तसेच आरोग्यविषयक समस्या आणि आवश्यक मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा अधिकार दिल्याचे सांगितले. मात्र आजही अनेक वंचित समाजघटक, विशेषतः भटके-विमुक्त समाज, शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेपासून दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, भटके-विमुक्त समाज हा ऐतिहासिक अन्याय सहन करत आलेला समाज आहे. सततचे स्थलांतर, कायमस्वरूपी निवाऱ्याचा अभाव, शिक्षणातील अडथळे, सामाजिक भेदभाव, मर्यादित रोजगार संधी आणि शासन योजनांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी या समस्या आजही गंभीर स्वरूपात आहेत. अनेक कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही, स्थिर उत्पन्न नाही आणि शासकीय कागदपत्रे अपुरी आहेत. या सर्वांचा त्यांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होत असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करून त्यांच्या अंमलबजावणी साठी कायदा निर्माण करावा असेही त्यांनी नमूद केले.

माजी पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी समाजाच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे सांगितले. उपेक्षित समाजघटकांनी संघटित होऊन स्थिर निवारा आणि उपजीविकेची साधने निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बापूसाहेब ठोकळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची आठवण करून देत उपेक्षित वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी उत्तरदायित्व स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

या मेळाव्यात विविध महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये भटक्या-विमुक्त कुटुंबांना विशेष बाब म्हणून तातडीने घरकुल योजना लागू करणे, घरासाठी जागा व बांधकामासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देणे, गायरान, शासकीय व गावठाण जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना मालकी हक्क देणे, भूमिहीन कुटुंबांना शेतीयोग्य जमीन वाटप करणे आणि जमीन उपजाऊ करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे यांचा समावेश होता. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यांसाठी विशेष मोहीम राबविणे, भटक्या-विमुक्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, महिला सक्षमीकरण व सामाजिक कुप्रथा निर्मूलनासाठी जनजागृती करणे, तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र बजेटची तरतूद करून त्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. धायटी येथील पारधी कुटुंबांना मूलभूत नागरी सुविधा आणि सुरक्षित घरकुल उपलब्ध करून देण्याचाही ठराव करण्यात आला.यावेळी मुलीना वह्या वाटप आणि संस्थेने पाडलेल्या बोअरवेलचे हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्वर ठोकळे, यशराजे साळुंखे पाटील, प्रभाकर कसबे, हरिश्चंद्र चौगुले, सुवर्णाताई नवले, डॉ. शिवराज भोसले, नंदू मोरे, विशाल राउळकर आणि प्रियांका भोसले यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश बाबर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शर्मिला केदार, गौसपाक मुलाणी, ललिता वाघमारे, गिरीधर इंगोले, सारिका घाडगे, शारदा गडदे, चंदन आटपाडकर, अमीर पटेल, स्वाती वाघमारे, सुषमा होवाळ आणि प्रियांका शेंडगे यांच्या सह अतुल भोसले, शशिकांत शिंदे, जालिंदर भोसले, रितेश शिंदे, राजू शिंदे, हर्षदा शिंदे, सुनिता शिंदे, सावा शिंदे, सुरवंता शिंदे, करीना भोसले यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यासाठी सोलापूर, सांगली, सातारा आणि बारामती परिसरातून भटका समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



